अखिल भारतीय हिंदू महासभेने सुरू केलेलं ‘गोडसे ज्ञानशाळा’ नावाचं वाचनालय दोन दिवसांतच बंद करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील आपल्या कार्यालयात अखिल भारतीय हिंदू महासभेने गोडसे ज्ञानशाळा नावाचं वाचनालय सुरू केलं होतं.
ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी गोडसे ज्ञानशाळा हे वाचनालय बंद केलं, तसंच वाचनालयातील साहित्यही जप्त करण्यात आलं. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं.
सोशल मीडियामध्ये गोडसे ज्ञानशाळा नावाने गंभीर संदेश पसरत होते. कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा दंडाधिका्यांनी परिसरात कलम १४४ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वाचनालय बंद करण्यात आलं, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिली. “हिंदू महासभेच्या सदस्यांसमवेत बैठक झाली आणि ज्ञानशाळा बंद करण्यात आली. सर्व साहित्य, पोस्टर्स, बॅनर व इतर साहित्य जप्त केले, ”असं संघी यांनी सांगितलं.
या वाचनालयाद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार होते. तसेच, रविवारी(१० जानेवारी) ही ज्ञानशाळा सुरू करताना नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 1:16 pm