पेट्रोलच्या दरांमध्ये सलग अकराव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशातही पेट्रोलने गुरुवारी शंभरी गाठली. पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर ३४ पैसे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे ३२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात पेट्रोलचे दर शंभरी रुपयांच्या पुढे गेले आहेत. दर शंभर रुपये झाल्यानंतर भाजपाच्या मंत्र्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. अभिनंदन करण्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केलं.
मध्य प्रदेशच्या अनुपपूर शहरात पेट्रोलचे दर लिटरमागे १००.२५ रुपये, तर डिझेलचे दर प्रति लिटर ९०.३५ रुपये इतके झाले. वाढत्या इंधनदरांमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत असताना मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असणाऱ्या विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांमुळे पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. “पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे आभार मानायला हवेत,” असे विश्वास सारंग यांचे म्हणणे आहे.
‘वाढत्या इंधनदरावरील कर कमी करून नागरिकांना ते उपलब्ध करता येऊ शकते का?’ असा सवाल विश्वास सारंग यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी “मला पंतप्रधानांचे अभिनंदन करायचे आहे. वाहतुकीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबत तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी व्यवस्था तयार केली आहे. मोदींच्या इलेक्ट्रॉनिक वाहने आणण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीवरील आपले नियंत्रण अधिक मजबूत होईल,” असे ते म्हणाले.
आणखी वाचा- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग ११ व्या दिवशी वाढ; जाणून घ्या मुंबईसह इतर राज्यांमधील दर
“आंतराष्ट्रीय बाजारात मागणी आणि पुरवठ्यामुळे तेलाचे दर कमी होतात. अशा परिस्थितीत जर आपण मागणी कमी केली तर तेलाच्या किंमतींवर आपले नियंत्रण असेल म्हणूनच मोदींनी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात आपण सक्षम बनू” असे ते पुढे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 1:45 pm