गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरा आणि बाइक, लॅपटॉप, एअर कंडिशनर किंवा वॉशिंग मशीन मोफत मिळवा. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असताना हे वाचून जरा आश्चर्य वाटलं असेल पण मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल पंप मालकांकडून अशीच ऑफर दिली जात आहे. विक्री कायम ठेवण्यासाठी आणि व्यवसायात टिकून राहण्यासाठी मध्य प्रदेशच्या पेट्रोल पंप मालकांकडून ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक व्हॅट आकारला जातो त्यामध्ये मध्य प्रदेशचा समावेश आहे. व्हॅटमुळे इंधनाच्या किंमतीमध्ये बराच फरक पडतो त्यामुळे येथील ट्रकचालक किंवा अन्य व्यावसायीक गाड्याही मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल न भरता राज्याची सीमा पार करुन अन्य राज्यांमधून पेट्रोल-डिझेल भरण्याला प्राधान्य देतात. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे स्थानिक नागरीकही राज्याची सीमा ओलांडून पेट्रोल भरतात.

काय आहे ऑफर –
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येथील अनेक पेट्रोल पंपांवर 100 लिटर डिझेल खरेदी केल्यास ट्रक ड्रायव्हरला नाश्टा आणि चहा मोफत दिला जात आहे. 5 हजार लिटर इंध खरेदी केल्यास मोबाइल, सायकल आणि हातातील घड्याळाची ऑफर दिली जात आहे. तर, 15 हजार लिटर इंधन खरेदी केल्यास कपाट, सोफा सेट किंवा 100 ग्रामचं चांदीचं नाणं जिंकण्याची संधी आहे. 25 हजार लिटर इंधन भरल्यास ग्राहकांना ऑटोमेटिक वॉशिंग मशीन, 50 हजार लिटर डिझेल भरल्यास स्प्लिट एसी किंवा लॅपटॉप आणि जर 1 लाख लिटर इंधन भरल्यास स्कूटर किंवा दुचाकीची ऑफर दिली जात आहे.

ऑफरमुळे विक्री वाढली –
या ऑफरनंतर विक्री वाढली असल्याचं पेट्रोल पंप मालकांनी सांगितलं. सवलत मिळवण्यासाठी ट्रकचालक 100 लिटर पेट्रोल खरेदी करत आहेत. शिवपुरी आणि अशोकनगर यासारख्या सीमेवरील जिल्ह्यांमधील काही पेट्रोल पंपावर अशा प्रकारच्या ऑफर आहेत.

व्हॅट कमी करण्याची मागणी –
मध्य प्रदेशमध्ये डिझेलवर 22 टक्के आणि पेट्रोलवर 27 टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे राज्य सरकारने टॅक्स कमी करुन आम्हाला दिलासा द्यायला हवा अशी येथील पेट्रोल पंप मालकांची मागणी आहे.