भाजपाच मध्य प्रदेशातील मिशन लोटस यशस्वी ठरलं आहे. काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली होती. काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. लवकरच मध्य प्रदेशात भाजपा सरकार स्थापन करत असून, शिवराज सिंह चौहान रात्री नऊ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

मध्यप्रदेशात धुळवडीच्या दिवशी राजकीय भूकंप झाला. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भाजपात गेले. तसंच त्यांनी २२ आमदारही फोडले. या सगळ्या घडामोडींमुळे मध्य प्रदेशचं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. राज्यपाल लालजी टंडन यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. आता भाजपाचं संख्याबळ मध्यप्रदेशात वाढलं आहे. त्यामुळे साहजिकच कोण मुख्यमंत्री होणार याचे कयास लावले जात होते. अखेर शिवराज सिंग चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज सायंकाळी सहा वाजता भाजपा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात सभागृह नेतेपदासाठी शिवराज  सिंह चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

कमलनाथ यांनी केली होती भाजपावर टीका

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी भाजपावर टीका केली होती. ‘आपण कोणत्याही खोट्या घोषणा केल्या नव्हत्या. भाजपाला १५ वर्ष मिळाले आणि मला १५ महिने मिळाले. सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून वारंवार प्रयत्न केले गेले. आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. भाजपाने कितीही अडथळे आणले तरी आम्ही विकासाच्या मार्गावर चालत राहणार. जनतेचा आमच्यावर विश्वास असून जनतेचं प्रमाणपत्र मिळेल. आम्हाला भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,’ असं ते म्हणाले होते.