गँगमनच्या प्रसंगावधानामुळे बुधवारी मध्यप्रदेशात मोठा रेल्वे अपघात टळला. रतलाम-अजमेर रेल्वे मार्गावर माननखेडाजवळ बुधवारी सकाळी रेल्वे रुळाला तडा गेला होता. गँगमनच्या ते लक्षात आले. त्याचवेळी रतलामकडून एक्स्प्रेस येत होती. गँगमनने एक्स्प्रेसकडे धाव घेतली. तब्बल ४५० मीटरपर्यंत तो धावला. त्याने एक्स्प्रेस थांबवली. गँगमनच्या या कर्तृत्वामुळे शेकडो रेल्वेप्रवाशांचे प्राण वाचले.

रेल्वे रुळाला ज्या ठिकाणी तडा गेला होता, तेथून फक्त ५० मीटरवर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला. २० मिनिटांनी गँगमनने रेल्वे रुळावर आपतकालीन प्लेट लावल्यानंतर एक्स्प्रेस मंदसौरकडे रवाना झाली. गँगमनच्या कामगिरीबद्दल रेल्वेच्या प्रवाशांनी त्याचे आभार मानले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १० वाजता रतलाम-जमुना ब्रिज पेसेंजर गाडी ढोढर स्थानकाहून रवाना झाली होती.

अजमेर-रतलाम रेल्वेमार्गावर रोजच्या प्रमाणे गँगमन अर्जुन मीणा रेल्वे रुळांची तपासणी करत होता. त्याचवेळी माननखेडाजवळ रुळाला जवळपास २५ मिमीचा तडा गेल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरुवातीला काय करायचे हे त्याला सूचेनासे झाले. गांभीर्य ओळखून त्याने ढोढरच्या दिशेने धाव घेतली. साधारण ४५० मीटरपर्यंत तो धावला. गँगमन धावत असल्याचे मोटरमनने पाहिले आणि एमर्जन्सी ब्रेक दाबले. ज्या ठिकाणी रेल्वे रुळाला तडा गेला होता, त्या ठिकाणाहून अंदाजे ५० मीटरवर एक्स्प्रेस थांबली होती. रेल्वे रुळांवरून एक्स्प्रेस गेली असती, तर मोठा अपघात झाला असता. रेल्वे रुळाचे काम केल्यानंतर १०.२५ च्या सुमारास एक्स्प्रेस मंदसौरच्या दिशेने रवाना झाली. माननखेडाजवळ खांब क्रमांक ३१९ जवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचे दिसले. त्याचदरम्यान, ढोढरवरून रतलाम-जमुना एक्स्प्रेस सुटल्याची माहिती मिळाली होती. रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वात आधी एक्स्प्रेस थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लाल झेंडा घेऊन ढोढरच्या दिशेने धाव घेतली, अशी माहिती अर्जुन मीणा या गँगमनने दिली.