न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढणे एका प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात दोषी ठरल्यास त्याला एक वर्ष तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

मध्य प्रदेशमधील उमारिया येथील जिल्हा सत्र न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के पी सिंह यांचे कोर्टरुम शनिवारी सकाळी बंद होते. याच दरम्यान प्रशिक्षणार्थी पोलीस कॉन्स्टेबल राम अवतार रावत तिथून जात होता. कोर्टरुममध्ये कोणीही नसल्याचे बघून राम रावतला न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढण्याचा मोह झाला. त्याने खुर्चीवर फोटो काढायला सुरुवात केली. काही वेळाने कोर्टातील कर्मचारी तिथे पोहोचला. त्याने रावतला फोटो काढण्यास विरोध करताच रावतने त्या कर्मचाऱ्याशीच वाद घातला.  ‘मी पोलीस कर्मचारी असून मला कोणीही रोखू शकत नाही’, असे त्याने सांगितले.

या घटनेची माहिती त्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली. अखेर पोलिसांनी त्या प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलला अटक केली. काही वेळात त्याला जामीन मंजूर झाला. बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.