करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन केलं जात आहे. पण तरीही अनेकजण हा नियम सर्रास पायदळी तुडवतात. याचं ताजं उदाहरण मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात पाहायला मिळालं.

करोना संकटातही काही तरुणी छिंदवाडातील बेलखेडी गावाजवळ असलेल्या पेंच नदीच्या किनारी पिकनीकसाठी गेल्या होत्या. पण अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्यांच्यातील दोघी मैत्रिणी नदीत अडकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १० ते १२ मित्र-मैत्रिणी पेंच नदीच्या किनारी गुरूवारी पिकनीकसाठी गेले होते. सेल्फी घेण्यासाठी त्यातल्या दोघी मैत्रिणी नदीच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या खडकावर गेल्या. पण बघता बघता अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्या दोघी तिथेच अडकल्या.

दोघी मैत्रिणींना अडकल्याचं पाहून त्यांच्यासोबत आलेल्या इतर मैत्रिणींनी पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आणि गावकऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करत दोघींचीही सुखरूप सुटका करण्यात आली.


अन्य मित्र-मैत्रिणींनी सूचना दिल्यानंतर संध्याकाळी उशीरा गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करत दोघींना नदीच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढलं.