देशात जातीभेदाचा विळखा अजूनही कायम आहे. मध्यप्रदेशमधील टिकमगढमध्ये दलित महिलेच्या हातचे जेवण जेवण्यास उच्च जातीतील विद्यार्थ्यांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेच्या घरी मध्यान्ह भोजन तयार केले जाते त्या महिलेचा मुलगाही याच शाळेत शिकतो.

मध्यप्रदेशमधील टिकमगडमध्ये एक सरकारी शाळा आहे. राज्यातील अन्य शाळांप्रमाणेच या शाळांमध्येही विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मध्यान्ह भोजन योजनेचे काम एका महिलेला देण्यात आले असून या महिलेचा मुलगाही याच शाळेत शिकतो. जेवण बनवणारी महिला ही दलित समाजातील असल्याने शाळेतील उच्चजातीच्या विद्यार्थ्यांनी तिच्या हातच्या जेवणास नकार दिला. शाळेतील १२ विद्यार्थीच मध्यान्ह भोजन करतात. उर्वरित विद्यार्थी त्यांच्या जातीतील नसल्याने जेवणास नकार देतात असे या महिलेच्या मुलाने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत जेवण हे शाळेच्या स्वयंपाक खोलीत तयार होणे अपेक्षित आहे. मात्र हे एका घरात तयार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये २०१५ मध्ये कर्नाटकच्या कोलार जिल्हय़ातील कग्गनहल्ली येथील शासकीय उच्च प्राथमिक शाळेतही दलित स्वयंपाकी असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिल्याचे समोर आले होते.