तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूवर मद्रास उच्च न्यायालयाने शंका व्यक्त केली आहे. जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मत न्यायमूर्ती वैद्यलिंगम यांनी व्यक्त केले आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी न्यायमूर्ती वैद्यलिंगम यांच्यासमोर सुरू आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे जयललितांच्या मृत्यूची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जयललितांच्या मृत्यूचे कारण जाणण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका
जयललिता यांच्या मृत्यूवरून प्रसार माध्यमांनी संशय व्यक्त केला आहे. वैयक्तिकरित्या मला स्वत:लाही जयललितांच्या मृत्यूबाबत संशय असल्याचे वैद्यलिंगम यांनी म्हटले. जेव्हा जयललितांवर रूग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा त्यांचा आहार योग्यरितीने सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जयललिता यांचे मृत्यूनंतर दहन न करता चेन्नईतील मरिना बीच येथे दिवंगत नेते एमजीआर यांच्या समाधी जवळच दफन करण्यात आले आहे.

जयललिता यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याची मागणी करत एआयडीएमकेचे सदस्य पी. ए. जोसेफ यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन करून जयललिता यांच्या मृत्यू मागचे रहस्य शोधण्याची मागणी केली आहे. त्यांनी २२ सप्टेंबर २०१६ रोजी जयललिता यांना अपोलो रूग्णालया दाखल केल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व घटनांचा तपशील दिला आहे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत लोकांना संशय असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

या जनहित याचिकेत १२ लोकांना उत्तरदायित्व ठरवलेले आहे. यामध्ये अपोलो रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रताप. सी. रेड्डी यांचाही समावेश आहे. या १२ लोकांचे नाव घेत सर्व नोंदी, अहवाल आणि सरकारी रूग्णालयांकडे जमा असलेल्या दस्ताऐवजांच्या चौकशीची मागणी करत अचानक रूग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयासारख्या गोष्टींवर उत्तर मागण्यात आले आहे.