मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘टीक-टॉक’ अॅपवरील बंदी उठवली आहे. भारतामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त युझर असल्याचा टीक-टॉक अॅपचा दावा आहे. पॉर्नोग्राफीक कंटेटमुळे मद्रास उच्च न्यायालयाने तीन एप्रिलला केंद्र सरकारला टीक-टॉक अॅपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.

मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अॅपवर बंदी घालण्याच्या अंतरीम आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार १८ एप्रिलपासून अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरवर टीक-टॉक अॅप ब्लॉक करण्यात आले होते.

टीक-टॉक वरील अयोग्य कंटेट ही अॅपची धोकादायक बाजू आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. टीक-टॉक अॅपची मालकी चिनी कंपनीकडे आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अंतरीम आदेश दिला आहे असे चिनी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सांगितले. बंदीमुळे दिवसाला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान होत असून २५० नोकऱ्या धोक्यात आहेत असा चिनी कंपनीने युक्तीवाद केला होता.

मागच्या तिमाहीत अॅप स्टोर आणि गुगल प्लेमधून सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या जगभरातील अॅपमध्ये टीक-टॉक तिसऱ्या स्थानावर होते. मार्च तिमाहीत जगभरातून टीक टॉकशी १८.८ कोटी नवे युजर्स जोडले गेले.