जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट घातल्यास तामिळनाडूतील मंदिरांमध्ये प्रवेशबंदी करणारा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत स्थगित केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराईतील खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशात एक जानेवारीपासून तामिळनाडूतील मंदिरात पुरुष भाविकांनी धोती (लुंगी) किंवा पायजमा आणि महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पोशाखातच प्रवेश करण्याचे आदेश दिले होते. हा पोशाख नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. या निर्णयाला राज्य सरकारने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
देवळांमध्ये जीन्स घालून जाता येणार नाही किंवा महिलांना पाश्चात्त्य वेश परिधान करता येणार नाही, हा नियम भाविकांसाठी जाचक असून, देवदर्शन घेण्याशी व्यक्तिस्वातंत्र्याचा असलेला संबंध कमकुवत करणारा असल्याची प्रतिक्रिया राज्यामध्ये उमटली होती. यामुळे तामिळनाडूतील मंदिरांमध्ये भाविकांचा ओघही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मदुराई खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.