सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढून विद्यार्थ्यांनी पोलीस कारवाईच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मद्रास विद्यापीठात विद्यार्थी निदर्शन करत असताना पोलीस घुसले आहेत.

दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलीस कारवाईविरोधात मद्रास विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले असता पोलीस विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि आंदोलनात अडथळा आणला. दरम्यान विद्यापीठाने २३ डिसेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

राजधानी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, लखनऊ, बनारस, चंडीगड, चेन्नई, बंगळुरु आणि गुवाहाटीसह अनेक शहरांतील उच्च शिक्षण संस्थांच्या आवारांचा आसमंत सोमवारी सरकारविरोधी घोषणांनी निनादला. संतापाला शांततेने वाट करून देताना विद्यार्थ्यांनी ‘जामिया’तील विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा व्यक्त केला.

दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशातील लखनौमधील दारूल उलूम महाविद्यालय, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, बिहारमधील पाटणा विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ, हैदराबादमधील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, आयआयटी, मद्रास, पाँडेचेरी विद्यापीठ, बंगळुरुतील जैन विद्यापीठ, आयआयटी, मुंबई, मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्था आणि हरियाणातील चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी आपआपल्या महाविद्यालयांच्या आवारात पोलीस कारवाईविरोधात निदर्शने केली होती.

दिल्लीत आज पुन्हा हिंसाचार
दरम्यान दिल्लीत आज पुन्हा एकदा हिंसाचार झाला. दिल्लीमधील सीलमपूर आणि जाफराबाद येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मेट्रो स्थानकांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान दगडफेक होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसंच अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये आंदोलक पोलिसांचा पाठलाग करत त्यांच्यावर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.