मॅगीला बाजारपेठेतून कुणी हुसकावले याचे श्रेय घेण्यावरून आता वादविवाद रंगले असून आपणच मॅगी विरोधात प्रथम तक्रार केली, असे १९९८ च्या तुकडीचे अन्न निरीक्षक संजय सिंह यांनी म्हटले आहे.
सिंह यांनी म्हटले आहे, की आपण परिश्रम केले, पण त्याचे श्रेय वरिष्ठ अधिकारी व्ही.के.पांडे यांनी घेतले. आपण नेहमीप्रमाणे अन्न पदार्थाची नैमित्तिक तपासणी करीत होतो. मॅगीची तपासणी करण्याचा हेतू नव्हता, पण त्यात मॅगीतील गैरप्रकार उघड झाला.
पांडे हे बाराबंकी येथे अन्न सुरक्षा विभागात कामाला आहेत. त्यांनी या कामात सिंह यांचे योगदान मान्य केले आहे. प्रशासकीय चौकटीत प्रत्येकाला काम दिले जाते. संजय यांना नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवायला सांगितले होते, पण नमुन्यात दोष आढळल्यानंतर कारवाई आपण केली आहे, त्यामुळे मॅगी प्रकरणाचे श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा दावा व्ही.के.पांडे यांनी केला आहे.
संजय सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे ते मॅगी प्रकरणाचा पाठपुरावा वर्षभरापासून करीत आहेत. सिंह यांच्या मते त्यांनी मॅगीचे नमुने १० मार्च २०१४ रोजी उचलले व गोरखपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यात शिसे व एमएसजी म्हणजे अजिनोमोटोचे जास्त प्रमाण दिसून आले.
नेस्लेसारख्या कंपनीला अंगावर घेताना आपण पुरेपूर खात्रीने हे सगळे केले, त्यासाठी पुन्हा नमुने गोळा केले व पुन्हा तपासणीला पाठवले. परंतु त्याचेही निकाल तेच आले, या नूडल्समध्ये एमएसजी व शिशाचे प्रमाण सुरक्षेच्या आठपट जास्त होते. गडबड आहे हे लक्षात येताच नेस्लेने आमच्या चाचण्यांना आव्हान दिले व कोलकाता येथील केंद्रीय अन्न प्रयोगशाळेत चाचण्या करण्याची मागणी केली, तेथेही शिशाचे प्रमाण जास्त आढळून आले, असा दावा त्यांनी केला.