कानपूर जिल्ह्य़ात बिख्रू खेडय़ानजीक तीन जुलै रोजी झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ जण कुख्यात गुंड विकास दुबे याच्या टोळीकडून चकमकीत मारले गेल्याच्या प्रकरणाची  दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. सर्व तीन आरोपी विकास दुबेचे साथीदार होते.

दुबेची सून चमा, नोकर रेखा अग्निहोत्री व एक शेजारी अशा तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी विकास दुबे व त्याच्या गुंडांना पोलिसांच्या स्थितीची चकमकीवेळी माहिती दिली होती. चमा ही आरोपी असून तिने तिच्या घरी पोलिसांनी चकमकीवेळी आसरा घेण्याचा प्रयत्न केला असता दार उघडले नव्हते.

मोलकरीण रेखा व तिचा शेजारी सुरेश वर्मा यांनी दुबेच्या गुंडांना पोलीस नेमके कुठे आहेत याची माहिती दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते सर्व पोलिसांना मारा एकही जिवंत सोडू नका, असे एकमेकांना ओरडून सांगत होते. यातील रेखा अग्निहोत्री ही दुबेचा उजवा हात व सध्या अटकेत असलेल्या दयाशंकर अग्निहोत्री याची पत्नी आहे. दयाशंकर याला कल्याणपूर येथे पोलिसांनी कानपूर चकमकीनंतर अटक केली होती. त्याने जबाबात असे सांगितले होते की, चौबेपूर पोलीस ठाण्यातून दुबेला पोलीस छापा टाकणार असल्याची माहिती देणारा दूरध्वनी आला होता. त्यामुळे त्याने इतर साथीदारांना बोलावून घेतले.

बिख्रू येथे पोलीस आले असता वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर दुबे टोळीच्या गोळीबारात आठ पोलीस मारले गेले असून त्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांचा समावेश आहे, विकास दुबे याच्या टोळीने त्याच्या घराच्या छपरावरून पोलिसांवर गोळीबार केला होता. विकास दुबे याच्यावर साठ गुन्हे दाखल आहेत.

दुबे टोळीला भाजपचा आश्रय

दुबे टोळीला भाजपचाच आश्रय असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनीलसिंह साजन यांनी केला असून दुबे हा भाजप मंत्र्याच्या घरातच लपल्याचे त्यांनी म्हटले आहे. विकास दुबे याला सरकारचा पाठिंबा असून त्याचे खरे सूत्रधार सरकारमध्ये असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी दुबेच्या मोबाइल फोनवरून कुणाला कसे कॉल झाले याची माहिती जाहीर केलेली नाही असा आरोप त्यांनी केला. चकमकीनंतर दुबे हा त्याची पत्नी रिचा व मुलासह फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी २.५ लाखांचे इनाम लावले असून ४० पोलीस ठाण्याचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत. दुबे याने एका भाजप नेत्याचा पोलीस ठाण्यामध्ये खून केला होता.