करोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याच्या अजब घटना देशात समोर येत आहेत. महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगड मध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे.  राजनांदगाव (छत्तीसगड)  महानगरपालिकेच्या नगरसेविका सुनीता फडणवीस यांनी करोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती विकसित झाल्याचा दावा केला. या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ बीएल कुमरे यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीता फडणवीस यांनी सांगितले की, १ एप्रिल रोजी त्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस मे मध्ये देण्यात आला. त्यानंतर पुजा करातांना त्यांच्या हाताला नाणी चिकटले. त्यानंतर त्यांनी मुलांना चमचं मागितला तर तो देखील त्यांच्या हाताला चिकटला. याचा व्हिडिओ बनवून सुनीता यांच्या पतीने डॉक्टरांना पाठविला. तर डॉक्टर हे लशीमुळे झालं, हे अद्याप सांगता येत नसल्याचे म्हणाले.

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.बी.एल. कुमरे यांनी सांगितले की, त्यांनी महिलेच्या हाताला नाणी व स्टीलच्या वस्तू चिकटल्याचे पाहिले. मात्र ही नवीन गोष्ट नाही, खूप आधीपासून असे घडत आहे. शरीराची रचना त्वचेच्या रचनेवर अवलंबून असते, पुष्कळ लोकांची त्वचा पूर्णपणे केसरहित असते, घामामुळे मिठाचे प्रमाण जास्त असते. शरीर लहान कणांपासून बनलेले असते, त्यात अर्धवट विद्युत चुंबकीय शक्ती देखील असते. त्याच बरोबर, कृत्रिम कपडे घालण्यामुळे घर्षण होते, ज्यामुळे त्वचेमध्ये चुंबकीय शक्ती तयार होते.

करोना लस घेतल्यावर अंगाला चिकटतंय स्टील आणि लोखंड? अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

महाराष्ट्रात देखील घडली घटना

नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्चला करोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून आरोग्य पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जात आहे. वेळ पडल्यास त्यांच्या रक्ताची तपासणीही केली जाणार आहे.

तज्ज्ञांनी फेटाळला दावा

“अंगाला वस्तू चिकटत असतील तर तपासणी केली पाहिजे. आतापर्यंत अनेकांना लस देण्यात आली असून एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, पण याचा आणि लसीचा काही संबंधी नाही”, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही हा चमत्कार नसून घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. हा विज्ञानाचा एक भाग असून वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magnetic force in body after taking corona vaccine chhattisgarh woman claims srk
First published on: 12-06-2021 at 18:33 IST