महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये काजळपुरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये काहींचा मृत्यू झाला असून जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात ४५ कुटुंबे राहात होती. दुपारनंतर इमारत खचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २५ कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. इमारतीचे वरचे तीन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेनंतर काही वेळातच ट्विट केले होते. “महाराष्ट्रातील महाड इमारत दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. ‘एनडीआरफ’ला मी या घटनेसाठी शक्य ती सारी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व नागरिक सुखरूप राहावेत हीच प्रार्थना”, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी संध्याकाळी घटना घडल्यानंतर काही वेळातच ट्विट केले. त्यानुसार एनडीआरएफच्या तुकड्या मदतकार्यात सहाय्य करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटनेबाबत राष्ट्रपतींचे ट्विट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील या घटनेबाबत मंगळवारी चिंता व्यक्त केली. “महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून जीवित हानी झाल्याची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ पथक, बचाव आणि मदत कार्य करत आहेत”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटना : बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल, बचावकार्य अजूनही सुरूच

दरम्यान, दुर्घटनेनंतर नगरपालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्यांवर महाड येथील ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. NDRFच्या तीन तुकड्या पुण्याहून रात्री एकच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनीही मदतकार्य सुरु केलं आहे.