२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आज (रविवार) विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच पराभवाची कारणे शोधून काढली आहेत. हे सर्व लोक आतापासूनच इव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात मग्न झाले आहेत. शनिवारी कोलकाता येथे ममता बॅनर्जींच्या मंचावर एकत्रित आलेल्या विरोधकांवरही त्यांनी टीका केली. त्यांनीही महाआघाडी केली आहे. आम्हीही महाआघाडी केली आहे. त्यांनी विविध पक्षांबरोबर महाआघाडी केली आहे. तर आम्ही जनतेशी महाआघाडी केली आहे. यातील कोणती महाआघाडी चांगली आहे, तुम्ही सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

कोल्हापूर येथील बुथ कार्यकर्त्याशी बोलताना मोदींनी इव्हीएमवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. हे लोक आतापासूनच लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणे शोधत आहेत. इव्हीएमला खलनायक ठरवत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक जिंकायची इच्छा आहे. पण जेव्हा काहीच पक्षांना जनतेचा आशीर्वाद मिळतो. तेव्हा ते वैतागतात. ते जनतेला मुर्ख समजतात. त्यामुळेच ते रंग बदलत आहेत.

यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींच्या रॅलीबाबत प्रश्न उपस्थित केला. तिथे मंचावर उपस्थित नेत्यांमध्ये बहुतांश लोक हे कोणत्या तरी मोठ्या नेत्यांची मुलं होती. काही जण असेही होते की, जे आपल्या मुलगा-मुलीला प्रस्थापित करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्याकडे धनशक्ती आहे. आमच्याकडे जनशक्ती आहे.

ही महाआघाडी अजब आहे. ही नामदारांची आघाडी आहे. हेी आघाडी तर भाऊ-भाचा, भ्रष्टाचार, घोटाळे, नकारात्मकता आणि असमानतेची महाआघाडी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.