लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये महाआघाडीने जागावाटपांची अधिकृत घोषणा केली आहे. महाआघाडीत राष्ट्रीय जनता दलाला 20 तर काँग्रेसला नऊ जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सीपीआय (एमएल) ला राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) खात्यातून एक जागा देण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता मनोज झा यांनी पत्रकार परिषदेआधी एक बैठक झाली असल्याची माहिती दिली. या बैठकीत तेजस्वी यादव, शरद यादव, जीतन राम मांझी यांच्यासहित अनेक नेते सहभागी झाले होते.

महाआघआडीत बिहारमधील 40 जागांपैकी आरजेडीला 20, काँग्रेसला नऊ, राष्ट्रीय लोकसमता पार्टीला (आरएलएसपी) पाच, हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 3, विकासशील इन्सान पार्टीला (व्हीआयपी) 3 आणि सीपीआय (एमएल) ला एक जागा देण्यात आली आहे. शरद यादव आरजेडीच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. तसंच हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जीतन राम मांझी गया मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

नवादा येथून आरजेडीकडून विभा देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जमुई लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकसमता पार्टीच्या भुदेव चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय औरंगाबाद येथून हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे उमेदवार उपेंद्र प्रसाद यांनी तिकीट देण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. 2014 मध्ये भाजपने येथे 22जागा जिंकल्या होत्या. लोक जनशक्ती पक्षाने 6 जागा जिंकल्या होत्या. राजदला मात्र फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. जदयूने 2 तर काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या.