महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी शुक्रवारी जाहीर केले. या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शु्क्रवारी जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्रातील २८८ आणि हरियाणातील ९० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीडमधील लोकसभा मतदारसंघासाठीही याच दिवशी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
२० सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. २७ सप्टेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असेल. २९ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख एक ऑक्टोबर असेल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
महाराष्ट्रात ९० हजार ४०३ मतदान केंद्रे असून, एकूण आठ कोटी २५ लाख ९० हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीची अधिसूचना जारी होईपर्यंत या दोन्ही राज्यांतील नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतात, असेही संपथ यांनी स्पष्ट केले. प्रत्येक उमेदवाराने उमेदवारी अर्जातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, एखादा रकाना रिकामा ठेवल्यास त्याचा उमेदवारी अर्ज बाद केला जाऊ शकतो, असेही संपथ यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीवेळीही ही अट घालण्यात आली होती. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, व्हिडिओ रेकॉर्डिंग यांच्यासह प्राप्तिकर आणि उत्पादन शुल्क विभागाचीही मदत घेण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.