चार राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार नसून महाराष्ट्र आणि हरयाणा राज्य विधानसभांच्या निवडणुका सर्वप्रथम होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी असून त्यापूर्वीच मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. त्या दृष्टीने केंद्रीय गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
निवडणुकीचा प्रचार ऐन दिवाळीत येऊ नये अशी सरकारची इच्छा आहे, तर लवकरच येणारी नवरात्र आणि ३ ऑक्टोबर रोजी येणारा दसरा यांतही निवडणुकीमुळे व्यत्यय येऊ नये, असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या जम्मू व काश्मीर आणि झारखंड राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात घेतल्या जातील असा अंदाज आहे.
महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा सप्टेंबरच्या मध्यावर जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली. निवडणुकीची धामधूम आणि सण-उत्सवांचा काळ एकत्रित येऊ नये याची काळजी घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व हरयाणा अशा दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतदान प्रक्रिया दिवाळीपूर्वी पार पाडण्याचा आयोगाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचा कालावधी विनाकारण जास्त असू नये आणि त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये याची खबरदारी निवडणूक आयोग घेणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.