गलवाण खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाल्याचं आता स्पष्ट झालंय. भारत-चीन संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली असून भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत ठार झालेत. यावरुन देशात चीनविरोधात संताप व्यक्त होत असताना या घटनेवर अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया आलेली नाही. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे.

“लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे”, अशा आशयाचं ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय घडलं…
भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, प्रत्यक्ष ताबारेषेवर सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अचानक अभूतपूर्व संघर्ष झाला. सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या पीएलए म्हणजेच चीनच्या सैनिकांनी माघार घेतल्याचे दिसले नसल्याने १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या टीमने चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायचे ठरवले. जे ६ जून रोजी ठरले त्याचे पालन करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

पण, चीनचे सैनिक मागे जायला तयार नव्हते. उलट परिस्थिती कशी चिघळेल यावर त्यांचा भर होता. त्यावेळी तिथे चीनचे सैनिक भारतापेक्षा संख्येने तिप्पट होते. कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्यासोबत चर्चेसाठी आलेल्या टीमवर चीनच्या सैनिकांनी हल्लाबोल केला. लाठ्या-काठ्या-दगडं आणि फेन्सिंगच्या तारा गुंडाळलेल्या रॉडनी चीनच्या सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकही गोळी या दरम्यान चालली नाही. पण दगड आणि रॉडमुळे भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही प्रतिहल्ला केला. त्यात चीनचे अनेक सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. तब्बल तीन तास ही झटापट आणि मारामारी सुरू होती

१५ जूनच्या रात्री घडलेल्या या प्रकारानंतर १६ जून रोजी सकाळी तीन भारतीय सैनिक शहीद झाल्याची सुरूवातीला बातमी आली होती. त्यानंतर रात्री २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त आले. पण, दुसऱ्या बाजूला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही दिसून आले आहे. मध्यरात्रीच्या या संघर्षात चीनचे ४३ सैनिक ठार झाले.