नवी दिल्ली : देशात कोविड साथीच्या सात महिन्यांनंतर ३३ हजार टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला असून महाराष्ट्रातील कचऱ्याचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात जैविक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५५०० टन होते.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जून २०२० मध्ये मिळालेल्या माहितीनुसार कोविड १९ जैववैद्यकीय कचऱ्यात पीपीई संच, मुखपट्टय़ा, बुटाची आवरणे, ग्लोव्हज, मानवी उती, ड्रेसिंगचे साहित्य, प्लास्टर कास्ट, सुया, रक्तपिशव्या, सिरिंज यांचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोविड १९ बीडब्ल्यू एम मोबाइल अ‍ॅपवरून कचऱ्याची माहिती संकलित केली होती. एकूण ३२,९९४ टन जैविक कचरा कोविडकाळात निर्माण झाला असून त्यावर १९८ प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

केरळ ३३०० टन, गुजरात ३०८६ टन, तमिळनाडू २८०६ टन, उत्तर प्रदेश २५०२ टन, दिल्ली २४७१ टन, पश्चिम बंगाल २९९५ टन, कर्नाटक २०२६ टन याप्रमाणे कचऱ्याचे प्रमाण होते.

’ महाराष्ट्रात ५३६७ टन जैववैद्यकीय कचरा सात महिन्यात तयार झाला.

’ डिसेंबरमध्ये ४५३० टन कचरा निर्माण झाला. त्यात महाराष्ट्रात ६२९ टन, केरळ ५४२ टन, गुजरात ४७९ टन, केरळ ५४२ टन, गुजरात ४७९ टन याप्रमाणे कचऱ्याची निर्मिती झाली. दिल्लीत ३२१ टन कचरा निर्माण झाला.

’ नोव्हेंबरमध्ये ४८६४ टन कचरा तयार झाला. त्यात महाराष्ट्र ६०९ टन, केरळ ६००, गुजरात ४२३ आणि दिल्ली ३८५ टन याप्रमाणे कचऱ्याचे प्रमाण होते.

’ ऑक्टोबरमध्ये ५५९७ टन कचरा तयार झाला. त्यात केरळात ६४१ टन, गुजरात ५४५ टन, महाराष्ट्र ५४२ टन कचरा होता.

’ सप्टेंबरमध्ये ५४९० टन कचरा तयार झाला. त्यात गुजरात ६२२, तमिळनाडू ५४३, महाराष्ट्र ५२४, उत्तर प्रदेश ५०७, केरळ ४९४ टन याप्रमाणे कचरा होता.