लोकसभेत आज दुष्काळाच्या प्रश्नावरून जोरदार वादावादी झाली. महाराष्ट्रातील धरणे ही साखर कारखान्यांसाठी बांधली गेली, शेतकऱ्यांसाठी नाही, अशी टीका कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी तत्कालीन काँग्रेसप्रणीत सरकारला उद्देशून केली, त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली.

दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्हय़ात भीषण दुष्काळ असून सरकार मदत देणार आहे की नाही, अशी विचारणा शिवसेना सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. काही काँग्रेस सदस्यांनीही तशीच विचारणा केली. त्यावर राधामोहन सिंह यांनी सांगितले, की मी उत्तर देतो, पण ते ऐकण्याची सहनशीलता ठेवा. राधामोहन सिंह म्हणाले, की महाराष्ट्रातील धरणे साखर कारखान्यांच्या हितासाठी बांधली गेली, शेतकऱ्यांसाठी नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळावर मीच चर्चेची मागणी करतो, त्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर येईल. त्यानंतर राधामोहन सिंह यांनी यूपीए सरकारने मनरेगासाठी नेहमी विलंबाने म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये निधी दिला असा आरोप केला.