राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे सत्तासंघर्षांवर चर्चा सुरू असली तरी सत्तास्थापण्याबाबत मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये शांतता दिसून आली.

राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पण, शिवसेनेचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेबाबत काँग्रेस नेतृत्वाच्या मनात असलेली अढी दूर झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चाचा सपाटा सुरू होता, पण त्यातून निष्पन्न काय झाले हे स्पष्ट झाले नव्हते.

आसनव्यवस्था बदलल्याने राऊतांची नाराजी

शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत माझी आसनव्यवस्था करणे हे धक्कादायक आहे. कुणी तरी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी, आमचा आवाज दडपण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप राऊत यांनी केला. याबाबत त्यांनी बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र पाठविले.

‘लवकरच स्थिर सरकार’ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी सहा तासांहून अधिक वेळ बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. सकारात्मक चर्चा झाली असून, सर्व मुद्दय़ांवर विचार करण्यासाठी गुरुवारीही चर्चा होणार आहे. तसेच, राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यात येईल आणि राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.