जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिथे राज्याबाहेरील जनतेचा जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधण्याची योजना आहे.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधायचे आहे. या रिसॉर्टच्या माध्यमातून अमरनाथ यात्रा आणि वैष्णव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मदत केली जाईल असे एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर महिन्याभराने महाराष्ट्र सरकारने आपला जमीन खरेदीचा विचार जाहीर केला आहे. कलम ३७० रद्द झाल्यामुळे भारताच्या अन्य भागातील जनतेचा जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा, गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जे याआधी शक्य नव्हते. दोन रिसॉर्ट बांधण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जागा निश्चित करण्यासाठी जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम पुढच्या १५ दिवसात सुरु होईल. एमटीडीसीच्या बोर्डाने लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अजून आम्हाला जागा सापडलेली नाही. श्रीनगरमध्ये विमानतळाजवळ आम्ही पाहत आहोत असे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

लेहमध्ये आम्ही गिर्यारोहणासंबंधीचे रिसॉर्ट सुरु करण्याचा विचार करत आहोत. कारण महाराष्ट्रातील जनतेला गिर्यारोहणामध्ये रस आहे. प्रत्येक रिसॉर्टसाठी आम्ही एक कोटी रुपये बाजूला काढले आहेत. जमीन खरेदीसंबंधी एमटीडीसीकडून लवकरच जम्म-काश्मीरच्या राज्यपालांना पत्र पाठवले जाईल असे जयकुमार रावल म्हणाले.