उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा, तसेच व्यवसाय सुरू करण्याची पद्धती सोपी व सहज करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे. आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.

केंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन) ने सोमवारी उद्योग व्यासायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात महाराष्ट्राला ९ क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे.

कधीकाळी पहिल्या क्रमांकवर असलेल्या गुजरातचीही घसरण झाली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते, हे येथे उल्लेखनीय. केंद्र सरकारने ३४० निकष लक्षात घेऊन ही   राज्याची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांना ९८.७८ टक्के गुण मिळाले. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही  राज्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. छत्तीसगड चौथ्या स्थानावर कायम आहे.

राज्य सरकारने राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी म्हणून उद्योगक्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांची संख्याही कमी केली असून एक खिडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, तरीही राज्य या क्रमावरीत पहिल्या पाचमध्येही येऊ शकले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशी आहे राज्यांची क्रमवारी

१) तेलंगणा, आंध्रप्रदेश  २) गुजरात ३) छत्तीसगड ४) मध्यप्रदेश ५) हरियाणा ६) झारखंड ७) राजस्थान ८) उत्तराखंड ९) महाराष्ट्र