मुसळधार पावसामुळे ओढवलेली पूरस्थिती आणि भूस्खलन यामुळे केरळ व कर्नाटकमध्ये भीषण संकट ओढवले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या राज्यांत ६६ लोक, तर देशभरात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तिकडे गुजरातमध्ये शुक्रवार सायंकाळपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये १९ लोकांनी जीव गमावला आहे.

पूर व पावसाचा तडाखा बसलेल्या दक्षिण महाराष्ट्रातही अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.केरळमध्ये गुरुवारपासून पाऊस, पूर व भूस्खलन अशा घटनांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या ४२ वर पोहचली आहे. राज्यात सुमारे सव्वा लाख लोक विस्थापित झाले आहेत. वायनाड व कोळिक्कोड या जिल्ह्य़ांना सगळ्यात जास्त तडाखा बसला असून तेथील प्रत्येकी २५ हजार लोकांचा विस्थापितांमध्ये समावेश आहे.

कर्नाटकमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत १२ लोक मरण पावले आहेत. बेळगावसह बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिर, गदग, उत्तर कन्नड, हावेरी, हुबळी- धारवाड, दक्षिण कन्नड, चिकमगळुरू व कोडागु या जिल्ह्य़ांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. तुंगभद्रा नदीच्या पाण्यामुळे दावणगेरे जिल्ह्य़ाचे अनेक भाग पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. सकलेशपूरमधील मारनहळ्ळी येथे दरडी कोसळल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

बचावकार्याला आपल्या सरकारचे प्राधान्य असल्यामुळे राज्यातील लोकांनी काळजी करू नये, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्य़ांमध्ये पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने पूरपरिस्थितीत सुधारणा झाली आहे