महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. एमएमटीसीच्या या निर्णामुळे नुकसान सहन करावे लागत असल्यामुले राज्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘एमएमटीसी’ने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातून कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली होती. दोन हजार टन कांदा आयात करण्यासाठी एमएमटीसीने निविदा काढली आहे. एमएमटीसीकडून वर्षातील ही पहिलीच निविदा काढण्यात आली आहे. ‘एमएमटीसी’कडून ६ सप्टेंबर रोजी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. २४ सप्टेंबरपर्यंत दोन हजार टनसाठी आवेदन मागवले आहे. याची वैधता १० ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खरीप हंगामात अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. त्यामुळे देशभरात कांदा महागला आहे. देशभरात सध्या कांद्याची कमतरता आहे. परिणामी कांदा प्रति किलो ५० रूपये झाला आहे. वाढत्या किंमतीमुळे सरकारने विदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजार टनसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना अमेरिकन डॉलरमध्ये बोली लावावी लागणार आहे. कमीतकमी ५०० टन कांद्यासाठी बोली लावावी लागेल अशी अट आहे.

दिवाळीनंतर खरीप हंगामातील पिकांची कापणी होणार आहे. काही दिवसांमध्ये मुबलक कांदा उपलब्ध होणार असताना इतर देशांतून आयात करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. भारतीय शेतकरी हे आपले शत्रू आहेत का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.