महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा तब्बल ९८ हजार कोटींचा प्रकल्प सध्या अडकून पडला आहे. बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकासाठी वांद्रे- कुर्ला संकुलातील(बीकेसी) जागा देण्यास महाराष्ट्राने नकार दिल्याने रेल्वेपुढे मोठा यशप्रश्न उभा राहिला आहे. रेल्वेच्या आराखड्यानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे- कुर्ला संकुलातील(बीकेसी) येथे बुलेट ट्रेनच्या स्थानकाची उभारणी करण्यात येणार होती. अनेक जागांची पाहणी केल्यानंतर आणि संबंधितांशी चर्चा झाल्यानंतर जपानमधील तज्ज्ञांकडून या जागी स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही जागा प्रस्तावित जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठी राखून ठेवली असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रेल्वेच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. मे महिन्यात यासंदर्भात रेल्वे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या दोन बैठकीही झाल्या होत्या. मात्र, या बैठकींमध्ये काही तोडगा निघाला नव्हता. या स्थानकामुळे महाराष्ट्राला १० हजार कोटींची महसुली तोटा होईल, असेही रेल्वेला सांगण्यात आले होते. दरम्यान, आता या वादात मध्यस्थी करण्यासाठी नरेंद्र मोदींना गळ घालण्याचा विचार रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी करत आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन२१ कि.मी सागरी बोगद्यातून 
रेल्वेला बुलेट ट्रेनचे हे स्थानक उभारण्यासाठी बीकेसीतील २८ हेक्टर जागेपैकी ०.९ टक्के जागा हवी आहे. मात्र, महाराष्ट्राच्या व्यावसायिक आस्थापनांच्या कायद्यांनुसार हे स्थानक उभारल्यानंतर प्रस्तावित जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठी फारशी जागा उपलब्ध होणार नाही. जागतिक वित्तीय सेवा केंद्राचा प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने खूपच महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे याठिकाणी बुलेट ट्रेन स्थानकाला जागा देण्यास महाराष्ट्राचा नकार आहे. मात्र, बुलेट ट्रेनमुळे जागतिक वित्तीय केंद्राचे महत्त्व आणखी वाढेल, असा उलट दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. परंतु काही केल्या या वादाचा तोडगा निघण्यास तयार नाही. मध्यंतरी केंद्राच्या हस्तक्षेपानंतर राज्य सरकारने यासंदर्भात काहीशी नमती भूमिका घेतली होती. बुलेट ट्रेनसाठी फारच थोडी जागा तीही जमिनीच्या खाली लागणार असल्याने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास रेल्वेला सांगण्यात आले होते. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
बुलेट ट्रेनबाबत सविस्तर आराखडा द्या