प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यााभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पना व कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेल्या या चित्ररथाने संचलनावेळी सर्वांची मने जिंकली होती. वर्ष २०१५ मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला. एकूण २३ चित्ररथ सादर करण्यात आले होते.

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होत. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.

प्रथम क्रमांक पटकावण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. यापूर्वी १९९२ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता. तो चित्ररथ पाहून त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजांनी शिवाजी महाराज की जय.. शिवाजी महाराज की जय.. हा जयजयकार केला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनीही त्यांना दाद देता महाराजांचा जयजयकार केला होता. राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ सादर करण्यात आले होते.