उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पण मागच्या काही वर्षांपासून या राज्यात गाडीच्या नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगण्याचं एक नवीन फॅड आलं आहे. यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.

पण आता उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षक हर्षल प्रभू यांनी पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या विषयात लक्ष घातले. अशा पद्धतीचे स्टिकर्स म्हणजे आपली जी सामाजिक वीण आहे, त्यासाठी एक प्रकारचा धोका आहे, असे हर्षल प्रभू यांनी म्हटले होते. पंतप्रधान कार्यालयाने या पत्राची दखल घेऊन उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले. त्यानंतर ही मोहिम सुरु झाली.