दक्षिण आफ्रिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जोहान्सबर्ग : राष्ट्रपिता म. गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत ‘केवळ गौरवर्णीयासाठी राखीव असलेल्या रेल्वे डब्यातून खाली उतरविण्यात आले होते त्या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

म. गांधीजींना ७ जून १८९३ रोजी रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून बाहेर हुसकावून लावण्यात आले होते. त्या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय उच्चायुक्त रुचिरा कम्बोज यांनी सांगितले की, ६ जून रोजी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून सुषमा स्वराज आणि अन्य मान्यवरांचे भाषण होणार आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील राजकीय नेत्यांसह ३०० मान्यवर सुषमा स्वराज यांच्यासह पेन्ट्रिच स्थानक ते पीटरमारित्झबर्ग स्थानक असा प्रतीकात्मक प्रवास करणार आहेत. त्यासाठी रेल्वेचे डबे आणि इंजिन खादीने आणि हाताने विणलेल्या कापडाने सजविण्यात येणार आहे. यासाठी खास भारतामधून खादी आयात केली जाणार आहे, असे कम्बोज यांनी सांगितले.