संयुक्त राष्ट्रे : दिल्लीतील हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी दु:ख व्यक्त केले असून समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी गांधीजींच्या शिकवणीचे पालन करण्याची आज  खरी गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  दिल्लीतील हिंसाचारात अनेक लोक बळी गेल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच संयम पाळण्याचे आवाहन केले असून हिंसाचार टाळण्याचे आटोकाट प्रयत्न करावेत असे गट्रेस यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते  स्टीफनी द्युजारिक यांनी सांगितले की, दिल्लीतील हिंसाचारावर सरचिटणीसांचे बारकाईने लक्ष असून गेल्या काही दिवसात दिल्लीत मोठा हिंसाचार झाला ही वेदनादायी बाब आहे. हिंसाचार थांबवण्यासाठी आता सर्वानीच कमाल संयमाचे दर्शन घडवले पाहिजे. संपूर्ण जीवनात आपण गांधीजींची शिकवण लक्षात ठेवली, आज ती शिकवण समाजात एकोपा निर्माण करण्यास उपयोगाची आहे. शांततेने निदर्शने करणाऱ्या लोकांना आडकाठी करू नये व सुरक्षा दलांनी संयम बाळगावा, असेही गट्रेस यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीतील दंगलीत बळी पडलेल्यांची संख्या आता ३८ झाली असून हिंसाचार कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. ईशान्य दिल्लीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हा हिंसाचार झाला असून जमावाने यात घरे,दुकाने, वाहने, पेट्रोल पंप पेटवले तसेच स्थानिक नागरिक व त्यांच्या घरांवर दगडफेक केली. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले, की हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.