भाजपाच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त असा केल्यानंतर मध्य प्रदेशमधील भाजपाच्या महिला आमदारानेही नथुराम गोडसेचे कौतुक केले आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रप्रेमीच होता आणि त्याने नेहमी देशाचाच विचार केला, असे भाजपाच्या इंदूरमधील आमदार उषा ठाकूर यांनी म्हटले आहे.

आमदार उषा ठाकूर यांना इंदूरमधील पत्रकार परिषदेत गोडसेविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर ठाकूर म्हणाल्या, नथुराम गोडसे राष्ट्रप्रेमीच होता. त्याने आयुष्यभर देशाचा विचार केला आणि त्याने कोणत्या परिस्थितीत महात्मा गांधींजीची हत्या करण्याचा निर्णय घेतला हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपण यावर भाष्य न करणे चांगले, असे त्यांनी सांगितले. उषा ठाकूर या दोन वेळा भाजपाच्या आमदार राहिल्या आहेत.

उषा ठाकूर यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला असून भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते हितेश वाजपेयी यांनी ही भाजपाची भूमिका नाही, असे स्पष्ट केले. उषा ठाकूर यांचे विधान निषेधार्ह असून त्यांनी हे विधान मागे घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाने निर्माण झाला होता

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील, असे वादग्रस्त विधान प्रज्ञासिंह यांनी केले होते. यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रज्ञासिंह यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. या विधानासाठी प्रज्ञासिंह यांना कधीही माफ करु शकणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.