राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व असून या चष्म्यांची लिलावातील किंमत ही थक्क करणारी आहे. या चष्म्यांची किंमत १०,००० ते १५,००० पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ९ ते १४ लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.

ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स या कंपनीच्या स्टाफला एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले आणि लेटरबॉक्समध्ये लटकत असलेले गांधीजींचे हे चष्मे सोमवारी (१० ऑगस्ट) आढळून आले. त्यानंतर त्यांनी या चष्म्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीचे संचालक स्टोव्ज यांनी याबाबत सांगितले की, कुणीतरी आमच्या लेटरबॉक्समध्ये लिलावासाठी शुक्रवारी रात्री एका लिफाफ्यातून हे चष्मे टाकले होते. तेव्हापासून सोमवारपर्यंत हे चष्मे या लेटरबॉक्सबाहेर लटकत होते. ज्या व्यक्तीला हे चष्मे विकायचे होते त्याला हे चष्मे आकर्षक वाटले पण त्याच्यासाठी त्याचं काहीही मोल नव्हतं म्हणूनच त्याने ते आम्हाला विकण्यास सांगितले. माझ्या एका कर्मचाऱ्याने ते माझ्याकडे आणून दिले आणि त्याने मला सांगितलं की, या चष्म्यांसोबत एक चिठ्ठी असून त्यामध्ये हे महात्मा गांधींचे चष्मे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर माझ्यासाठी ही दिवसभरातील खूपच चित्तवेधक बाब ठरली.

त्यानंतर जेव्हा स्टोव्ज यांनी या चष्म्यांचं मुल्यांकन केलं तेव्हा त्यांच्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, त्यांना कळले की या चष्म्यांच्या काड्या या सोन्याच्या होत्या. तसेच भारतीयांच्या नागरी हक्कांसाठी लढा देणाऱ्या महान व्यक्तीने अर्थात महात्मा गांधींनी ते वापरले होते. त्यामुळे या चष्म्यांची बोली १५,००० पौडांपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

हे चष्मे सन १९०० मध्ये महात्मा गांधींनी वापरले होते. काही काळ वापरल्यानंतर त्यांनी आपले हे चष्मे आपल्या एका सहकार्याला भेट म्हणून दिले होते. इंग्लंडमधील एका ज्येष्ठ विक्रेत्याकडे गांधीजींचे हे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना गांधीजींनी ते भेट दिले होते. जेव्हा ते १९१० ते १९३० या काळात ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करीत होते. आमच्याकडे हा ऐतिहासिक चष्मा असल्याचे समजल्यानंतर आम्हाला याचे आश्चर्य वाटते, असे या लिलावकर्त्याने म्हटले आहे. सध्या ऑनलाइन लिलावात या चष्म्यांना ६००० पौंडांची बोली लागली आहे. ही बोली १०,००० ते १५,००० पौंडांपर्यंत जाऊ शकते.