जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचा खटला चालवणाऱ्या वकिलांनी आक्षेपार्ह वक्तव्य करीत मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना जिहादी मुख्यमंत्री संबोधले आहे. मुख्यमंत्री आपल्या इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडवू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच वकिलांनी गेल्या महिन्यांत गुज्जर्स आणि बकरवाल मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याबाबत वक्तव्य केले होते. अंकुर शर्मा असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या या वकिलाचे नाव आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अॅड. अंकुर शर्मा म्हणाल्या, मेहबूबा मुफ्ती या एक जिहादी मुख्यमंत्री आहेत. त्या गोहत्येसाठी कत्तलखाने आणि गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. जम्मू हिंदूबहूल ठिकाण आहे. या ठिकाणी मुस्लिमांना जमिनी देऊन त्यांचे बस्तान बसवले जात आहे. जम्मूची हिंदूबहूल ओळख पुसली जावी यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. अंकुर शर्मा हे कथुआ सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी संजीराम यांचे वकिल आहेत. संजीराम हा या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे क्राईम ब्रांचने म्हटले आहे. या प्रकरणात संजीराम याचा मुलगा विशाल जंगलोटा आणि विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया यांचाही समावेश आहे.

३१ वर्षीय शर्मा म्हणाल्या की, त्या या प्रकरणाबाबत हिंदू महासभेसहित अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत बातचीत करीत आहेत. हिंदू एकता मंच स्थापन करुन ते आरोपीच्या समर्थनार्थ सीबीआयच्या चौकशीची मागणी करणार आहेत.

मेहबूबा मुफ्ती यांच्यावर हल्लाबोल करताना शर्मा म्हणाले, फेब्रुवारीत मुफ्ती यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले होते की, जोपर्यंत सरकार कोणती आदिवासी, जाती-जमाती कायदा करीत नाही तोपर्यंत मुस्लिम बकरवाल समुदायाला जंगलातून हटवता येणार नाही. मुफ्ती या मुस्लिम बकरवाल समाजाला आदिवासी जमात मानतात. या आदेशामुळे बकरवाल समुदयाच्या लोकांनी जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत.

हा एक सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोपही शर्मा यांनी केला आहे. यामागे इस्लामी शक्ती काम करीत आहेत. या शक्ती बकरवाल लोकांच्यामाध्यमातून बाजारभावापेक्षा जास्त भावाने जमीन खरेदी करीत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे.