श्रीलंकेच्या नेतृत्वाची चौथ्यांदा संधी

कोलंबो : श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून महिंदा राजपक्षे यांचा शतकांपूर्वीच्या जुन्या बौद्ध मंदिरात शपथविधी झाला. त्यांच्या पक्षाला संसदीय निवडणकीत मोठे बहुमत मिळाले असून पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी सत्तेवर पकड घट्ट केली आहे.

माजी अध्यक्ष असलेले ७४ वर्षीय राजपक्षे हे श्रीलंका पीपल्स पार्टीचे नेते असून त्यांना त्यांचे बंधू व अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांनी शपथ दिली. महिंदा राजपक्षे हे चौथ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. लोकांनी मला सेवेची पुन्हा संधी दिली याबाबत मी ऋणी आहे असे त्यांनी शपथविधीनंतर म्हटले आहे.

महिंदा राजपक्षे यांनी सांगितले की, लोकांनी जो विश्वास दाखवला त्यातून देशसेवेची प्रेरणा मिळत राहील. श्रीलंकेला आम्ही प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न करू.

पंतप्रधानांचा राजमहा विहार या उत्तर कोलंबोतील केलानिया भागात असलेल्या धार्मिक स्थळी शपथविधी झाला असता श्रीलंका पीपल्स पार्टीच्या समर्थकांनी फटाके वाजवले. हे बौद्ध मंदिर २५०० वर्षांपूर्वीचे आहे. श्रीलंका पीपल्स पार्टीला महिंदा व गोतबया राजपक्षे यांनी मोठा विजय मिळवून दिला.  ५ ऑगस्टला ही सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात त्यांना दोन तृतीयांश बहुमत मिळाले. भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त गोपाल बागले यांनी शनिवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे भेट घेऊन अभिनंदन केले. बागले यांनी भारत सरकार श्रीलंकेतील नवीन सरकारबरोबर द्विपक्षीय सहकार्य करील, असे आश्वासन दिले.  राजपक्षे यांना मिळालेले मोठे बहुमत ही दोन्ही देशांतील सौहार्दाचे संबंध वाढवण्यासाठी, एकमेकांना मदत करण्याची मोठी संधी आहे, असे बागले यांनी सांगितले.