कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून गोताबाया राजपक्ष यांची निवड झाल्यानंतर गुरुवारी त्यांचे ज्येष्ठ बंधू महिंदा राजपक्ष यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे श्रीलंकेतील राजकीय क्षेत्रावर शक्तिशाली आणि वादग्रस्त राजपक्षे घराण्याने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे बोलले जात आहे.

महिंदा राजपक्ष यांना गोतबाया यांनी अध्यक्षीय सचिवालयात पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत महिंदा राजपक्ष काळजीवाहू मंत्रिमंडळाचे पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.

या शपथविधीला माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे आणि अनेक राजकीय नेते हजर होते. महिंदा राजपक्ष हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी गोताबया राजपक्ष यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

श्रीलंकेच्या नव्या सरकारसोबत काम करण्याची भारताची इच्छा

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नव्या सरकारसोबत अतिशय जवळिकीने काम करण्याची आपली तयारी असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. यासोबतच, श्रीलंकेत राहणाऱ्या तमिळ समुदायाच्या आशाआकांक्षा नवे सरकार पूर्ण करील, अशी आशाही भारताने व्यक्त केली.

नव्या सरकारसोबत घनिष्ठतेने काम करण्याची भारताची इच्छा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अधोरेखित केली.

महिंदा राजपक्ष यांनी गुरुवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांचे लहान बंधू अध्यक्षपदी निवडून आले होते. या घडामोडींमुळे शक्तिशाली आणि वादग्रस्त अशा राजपक्ष यांची देशातील राजकारणावरील घट्ट पकड दिसून आली आहे.