कारनॉट टेक्नॉलॉजीस या कंपनीमध्ये महिंद्र अँड महिंद्र कंपनीने सहा कोटी रुपयांची गुंतवणूक करून 22.9 टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. आधीची कारनॉट कंपनी स्मार्ट कार सोल्युशन्सवर काम करत होती जी आता कारसेन्स या नावानं ओळखली जाते. कारसेन्स ही स्मार्ट कार सोल्युशन देणारी सेवा त्यांनी दाखल केली आहे. महिंद्रच्या गुंतवणुकीमुळे मिळालेला निधी आता तंत्रज्ञानात्मक प्रगतीमध्ये आणखी नवीन शिखरे गाठण्यासाठी करण्यात येणार असल्याचे वृत्त व्हिसीसर्कलनं दिलं आहे.

विशेष म्हणजे कारनॉट हा स्टार्टअप आयआयटी मुंबईमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी 2015 मध्ये लाँच केला. पुष्कर लिमये, रोहन वडगावकर, प्रथमेश जोशी व उर्मिल शाह अशी या इंजिनीअर्सची नावं असून कारसेन्स हे आताच उत्पादनाचं नाव आहे. कारसेन्सचं उतपादन करणं, विक्री करणं, सेवा पुरवणं आणि वाहनांची व उत्पादनाची कार्यक्षमता तपासणं ही सगळी कामं केली जातात.

कारसेन्स हे स्मार्ट कार डिव्हाइस असून कारमध्ये ऑन बोर्ड डायग्नोस्टिक या पोर्टला लावलं जातं, व ते ग्राहकाच्या स्मार्टफोनशी अॅपनं जोडलेलं असतं. सर्विसिंगच्या सूचना, सुरक्षेचे उपाय, देखभालीच्या सूचना, जीपीएस ट्रॅकिंग, अपघाताचा अॅलर्ट, वाहनाची कार्यक्षमता, इंधनाचा वापर, सफरीची माहिती, वेगानं गाडी चालवल्यास सूचना. रस्त्यावर मध्येच कसली गरज पडली तर मदत अशी बहुआयामी कामगिरी कारसेन्स करतं.

गेल्या आर्थिक वर्षात या स्टार्टअपनं 1.2 कोटी रुपयांची उलाढाल केली. या स्टार्टअपची टॉप थ्रीमधलं एक म्हणून क्वालकॉम डिझाइन इंडिया चॅलेंजमध्ये निवड करण्यात आली होती. आता महिंद्र अँड महिंद्रनं या स्टार्टअपमध्ये सहा कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारसेन्सच्या टीमवर विश्वास टाकला आहे.

गेल्या आठवड्यात महिंद्र अँड महिंद्रने झूम कार या सेल्फ ड्राइव्ह रेंटल कार कंपनीतलाही 16 टक्के हिस्सा विकत घेतला असून त्यासाठी 176 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर जानेवारीमध्ये महिंद्रने मित्र अॅग्रो इक्विपमेंटमध्ये आठ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती. याचा फायदा मित्रला आपल्या उत्पादनांची संख्या वाढवण्यासाठी होणार आहे.