सामान्यपणे घर खरेदी केल्यानंतर त्या घराचा ताबा वेळेत मिळेल की नाही अशी शंका प्रत्येक सामान्य ग्राहकाच्या मनात येते. अनेकदा बिल्डरने वेळेत घराचा ताबा दिला नाही म्हणून प्रकरण कोर्टापर्यंत जाते. त्यानंतर सुरु होतो कायदेशीर लढा. सामान्यपणे बांधकाम व्यवसायिकांकडून घराचा ताबा देण्याची तारीख उलटून गेल्यानंतरच घराचा ताबा ग्राहकांना देण्यात येतो. मात्र सर्वच बांधकाम व्यवसायिक असे असतात असं नाही. अनेकदा बांधकाम व्यवसायिकांकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने घराचा ताबा दिला जातो. असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर एका पत्रकाराने पोस्ट केला असून हा फोटो महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केला असून महिंद्रा अॅण्ड महिंद्राचाच हा प्रोजेक्ट असल्याचे समजते.

बेंगळुरूमधील पत्रकार तुषार कनवार यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एका उंच इमारतीला लाल रंगाची रिबीन बांधण्याचे दिसत आहे. एखाद्या भेटवस्तूच्या बॉक्सला बांधतात त्याप्रमाणे ही रिबीन या इमारतील बांधलेली दिसत आहे. हे ट्विट करताना तुषार म्हणतात, “नवीन घर देण्याची ही एक अनोखी पद्धत आहे” पुढे या ट्विटमध्ये त्यांनी आनंद महिंद्रांना टॅग केले आहे.

हे ट्विट आनंद महिंद्रांनी रिट्वीट करत कोट केले आहे. यावर बोलताना महिंद्रांनी ही अभिनव कल्पना राबवणाऱ्या महिंद्रा लाइफस्पेसच्या कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन केल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी गिफ्टच्या या रिबीनची गाठ कोण सोडणार? असा मजेदार प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

तुषार यांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरूमधील ‘महिंद्रा विंडचिम्स’ या प्रकल्पामधील इमारतीचा हा फोटो आहे. अरीकेरी परिसरातील वेणूगोपाल रेड्डी लेआऊट येथे ही इमारत असून या इमारतीमध्ये घरे घेणाऱ्यांना लवकरच घरांचा ताबा देण्यात येणार आहे. अनेक नेटकऱ्यांना तयार इमारतीला गिफ्टची ही रिबीन लावण्याची कल्पना आवडली आहे. दिवाळीच्या सुमारास घरांचा ताबा मिळणार असल्याने ग्राहाकांनाही हा एक सुखद धक्काच मिळाला आहे.