मोलकरणीच्या व्हिसा घोटाळाप्रकरणी अमेरिकेतील उपमहावाणिज्य राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडालेली असताना, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्या अनेक मोलकरणी कोणतीही पूर्वसूचना न देता घरातून निघून गेल्याचे समोर आले आहे.
२०११ मध्ये राजदूत मीरा शंकर यांनी अमेरिकेतील आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मोलकरणीने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे सरकारी निवासस्थान सोडून दिले होते. त्यानंतर ती पुन्हा शहरात परतली
नाही.
या घटनेनंतर भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्या महिला कामगारांच्या वास्तव्याबाबतचा प्रश्न समोर आला आहे. अशाप्रकारे भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्या अनेक महिला कामगार कामाचा कालावधी संपल्यानंतर मूळ काम सोडून बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव्य करीत असल्याचे येथील सूत्रांनी सांगितले. केवळ महिला कामगारच नव्हे तर सुरक्षारक्षकाचे काम करणारे भारतीयदेखील आपल्या कामाचा कालावधी संपल्यानंतर पळून जाऊन अज्ञातपणे अमेरिकेत राहत असल्याचे बोलले जाते.
२०१२ मध्ये अमेरिकेने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणींसाठी ५४ ए-३ व्हिसा मंजूर केले होते. गेल्यावर्षी एक हजार १४१ व्हिसा मंजूर करण्यात आले होते, तर ७४९ अर्ज फेटाळले होते.
 गेल्या १० वर्षांत अमेरिकेने ४७० ए-३ व्हिसा भारतीय नागरिकांना मंजूर केले आहेत.