गेल्या तीन महिन्यांमध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा, वसंत विहार पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त ऑपरेशन दक्षिण जिल्हा आणि पोलीस उपायुक्त ऑपरेशन नवी दिल्ली यांनी अरुण जेटली यांच्या मोबाईलवरून करण्यात आलेले कॉल्स तसेच त्यांच्या मोबाईलवर आलेल्या इनकमिंग कॉल्सचे तपशील मागितल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी पोलीस उपायुक्त (ऑपरेशन, नवी दिल्ली) यांच्या कार्यालयातून अरविंद डबास नामक पोलीस शिपायाने आपल्याच उपायुक्तांचा ई-मेल व पासवर्ड वापरून १७ जानेवारी रोजी मोबाईल कंपनीला जेटली यांच्या कॉल्सचे तपशील मागितल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्ली पोलीसच्या विशेष शाखेत तैनात असलेला हा पोलीस शिपाई पाच महिन्यांपासून रजेवर होता. त्याला अटक करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये एका बिल्डरकडे त्याचे पैसे अडकले होते. ते परत मिळविण्यासाठी दोन इसमांनी आपल्याला जेटली यांच्या मोबाईल कॉल्सचे तपशील घेण्यास सांगितले. त्यामुळे आपण उपायुक्तांचा ई-मेल हॅक करून जेटलींना मोबाईल सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला मेल पाठवून हा तपशील मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे डबासचे म्हणणे आहे. त्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण डबास आपल्या बचावासाठी दिशाभूल करणारा तर्क देत असला तरी अन्य तीन पोलीस ठाण्यांतूनही जेटली यांच्या मोबाईल कॉल्सचे तपशील मागण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे या प्रकरणाचे रहस्य आणखीच वाढले आहे. हे प्रकरण घडले तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली होती. पाँटी चढ्ढा हत्या प्रकरणातील आरोपी नामधारीच्या मोबाईलवर झालेल्या कॉल्समध्ये हा क्रमांक आढळल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. जेटलींना मोबाईल सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून त्याची चौकशी केली आणि तब्बल चार पोलीस ठाण्यांनी जेटलींच्या कॉल्सचा तपशील मागितल्याचे उघड झाले. ही बेकायदेशीर गोष्ट असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची पुन्हा आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते असलेले जेटली यांची हेरगिरी कशापोटी करण्यात येत आहे, याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली. हे प्रकरण गंभीर असून हा विषय संसदेत उपस्थित करण्यात येईल, असे ते म्हणाले. अरुण जेटली हे उत्तराखंड भाजपचे प्रभारी होते. अटक करण्यात आलेला पोलीस शिपाई अरविंद डबास याचे उत्तराखंडमधील नेत्यांशी तसेच एका भाजप नेत्याशी संपर्क होता.