तामिळी वाघांविरोधात जोरदार मोहीम उघडून त्यांचा निपात करत तुफान लोकप्रियता प्राप्त करणारे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदूा राजपक्षे यांना मतदारांनी शुक्रवारी घरचा रस्ता दाखवला. अध्यक्षीय निवडणुकीत राजपक्षे यांचेच एकेकाळचे सहकारी असलेले मैत्रिपाल सिरिसेना हे तब्बल ५१ टक्के मते मिळवत विजयी झाले. सिरिसेना यांनी तातडीने अध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारली.
राजपक्षे यांचा एककल्ली आणि घराणेशाही राबवण्याच्या कारभाराला विटलेल्या मतदारांनी त्यांना अखेरीस सत्तेतून खाली खेचले. गेल्या दशकभरापासून राजपक्षे अध्यक्षपदी होते. सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून येता यावे यासाठी त्यांनी घटनेत दुरुस्ती करण्याचा घाटही घातला होता तसेच मुदतपूर्व निवडणुकाही जाहीर केल्या. मात्र, मतदारांनी त्यांना अव्हेरत सिरिसेना यांनाच पसंती दिली. दीड कोटी मतदारांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवार सायंकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच राजपक्षे पिछाडीवर राहिले. सिरिसेना यांना ६२ लाख १७ हजार १६२ मतदारांनी पसंती दिली तर राजपक्षे यांना ५७ लाख ६८ हजार ९० मतदारांनी प्राधान्य दिले. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सिरिसेना विजयी झाल्याचे घोषित केले. तत्पूर्वीच राजपक्षे यांनी अध्यक्षीय प्रासादाचा त्याग केला. सायंकाळी सिरिसेना यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांचे सहकारी रनील विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तमीळ आणि मुस्लिम मतदारांनी सिरिसेना यांच्या पारडय़ात अधिक मते टाकल्याने त्यांना अध्यक्षपदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. ६३ वर्षीय सिरिसेना यांना सिंहलीशिवाय अन्य कोणतीही भाषा येत नाही. मीतभाषी म्हणून ओळखले जाणारे सिरिसेना यांनी राजपक्षे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आरोग्यमंत्री म्हणून कामही केले आहे. तसेच सत्ताधारी श्रीलंक फ्रीडम पार्टीचे ते सरचिटणीसही होते. मात्र, राजपक्षे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी पक्षत्याग केला.