जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराला मोठे यश आले आहे. लष्कराने पाकिस्तानी सैनिकांचा गणवेश घातलेल्या दोन घुसखोरांचा खात्मा केला. क्रूरतेसाठी बदनाम असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) ते सदस्य होते. भारतीय लष्कराविरोधात मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात ते होते.

या घुसखोरांकडे मोठ्याप्रमाणात दारूगोळ्यांचा साठा मिळाला. या शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचे चिन्ह आहेत. या घुसखोरांनी पाकिस्तानी सैनिकांकडून युद्धादरम्यान घालण्यात येणारे कपडे परिधान केले होते. यातील काही घुसखोरांनी भारताच्या बीएसएफ आणि भारतीय लष्कराच्या जुन्या गणवेशासारखे कपडेही परिधान केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हे घुसखोर भारतीय सीमेत प्रवेश करत होते. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात येत होता.

दरम्यान, या घुसखोरांचे मृतदेह परत घेऊन जाण्यास पाकिस्तानला सांगण्यात येणार असल्याचे लष्कराने म्हटले आहे. मारले गेलेले लोक हे पाकिस्तानी लष्कराचे जवान असल्याचे दिसून येते, असेही लष्कराने म्हटले आहे. पाकिस्तानी घुसखोर नियंत्रण रेषेवर असलेल्या घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्याचा फायदा घेऊन भारतीय सीमेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान, भारतीय सैनिकांनी त्यांचा खात्मा केला. लष्कराने अद्याप मारले गेलेल्या घुसखोरांच्या संख्येची माहिती दिलेली नाही.