पाकिस्तानमधील सेहवानमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लाल शहबाज कलंदरमधील सुफी दर्ग्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. दर्ग्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या भागात आत्मघाती हल्ला करण्यात आल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. स्फोटातील जखमींना मेडिकल संकुल जमशोरा आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

दक्षिण पाकिस्तानमधील लाल शहबाज कलंदरमधील सुफी दर्ग्यात गुरुवारी स्फोट झाला. गेल्या आठवड्याभरातील पाकिस्तानमधील हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. सुफी संप्रदायातील ‘धमाल’ हा विधी सुरू असताना दर्ग्यात स्फोट झाला. यावेळी दर्ग्यात शेकडो भाविक उपस्थित होते. दर्ग्यात स्फोट झाल्यानंतर जिल्ह्यात आपात्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली. घटनास्थळापासून रुग्णालय दूर असल्याने जखमींना वेळेत उपचार पुरवणे कठीण होते आहे. सुफी दर्ग्यापासून रुग्णालय जवळपास ४० ते ५० किलोमीटर अंतरावर आहे.

‘दर्ग्यात झालेला स्फोट हा आत्मघाती हल्ला आहे. हा स्फोट दर्ग्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या भागात झाला,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तारिक विलायत यांनी दिली आहे. ‘पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. गुरुवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्ग्यात जातात. हैदराबाद आणि जवळपासच्या भागातून दुर्घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवल्या जात आहेत,’ अशी माहिती बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.