News Flash

गुजरात राज्यसभा निवडणूक: काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

अहमद पटेल यांचा विजय अवघड

अहमद पटेल (संग्रहित छायाचित्र)

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून मतांची जुळवाजुळव सुरु असताना या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अहमद पटेल यांची राज्यसभेची वाट बिकट होणार आहे. मंगळवारी गुजरातमधील तीन जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

भाजप आणि काँग्रेसकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. या आमदारांना भाजपला मतदान करण्याच्या सूचना पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार कंधाल जाडेजा यांनी याबद्दलची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

आज (सोमवारी) सकाळी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘भाजपच्या बलवंतसिंग राजपूत यांना मतदान करण्याच्या सूचना पक्षाकडून करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जाडेजा यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याने आता काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत यांना मैदानात उतरण्यात आले आहे. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. गुजरात विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या सध्या ४४ इतकी आहे. त्यामुळे अहमद पटेल यांचा विजय अवघड मानला जातो आहे. मागील काही दिवसांमध्ये सहा आमदारांनी काँग्रेसला रामराम केल्याने आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने अहमद पटेल यांच्यासमोरील आव्हान खडतर झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:08 pm

Web Title: major blow for congress after ncp decides to vote for bjp in gujarat rajya sabha elections
Next Stories
1 १२ ऑगस्टची रात्र दिवसाप्रमाणे उजळणार!
2 हाफिज सईदचा राजकारणात प्रवेश; मिल्ली मुस्लिम लीगची स्थापना
3 मेधा पाटकर आणि उपोषणकर्ते अटकेत, पोलिसांकडून बळाचा वापर
Just Now!
X