पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं दिसत आहे. शनिवारी नियंत्रण रेषेवर नौसेरा सेक्टरमध्ये तपासणीदरम्यान आयईडी डिफ्यूज करताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात ३१ वर्षीय मेजर चित्रेश सिंह बिष्ट शहीद झाले. मेजर चित्रेश यांचे सात मार्च रोजी लग्न होते.

उत्तराखंडमधील पोलीस निरीक्षक एसएस बिष्ट यांचा चित्रेश मुलगा आहे.  चित्रेश यांचे पिता एसएस बिष्ट उत्तराखंडमधील रानीखेत पिपली गावचे रहिवासी आहेत. तीन फेब्रुवारीला सुट्टी संपवून चित्रेश कर्तव्यावर परतले होते. यापूर्वी मध्य प्रदेशातील महू इथे त्यांनी प्रशिक्षणही घेतलं होतं. २८ फेब्रुवारीपासून चित्रेश लग्नाच्या सुट्टीवर येणार होते. मुलाचे लग्न असल्यामुळे वडिल लग्नाच्या पत्रिका वाटत होते. त्यातच आपला मुलगा शहीद झाल्याची बातमी त्यांना समजली. शहीद चित्रेश बिष्ट यांचं पार्थिव रविवारी देहरादूनला येण्याची शक्यता आहे. या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० किमी वर आहे.