पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते आहे. आशिया खंडातील सर्व देशांचा विचार केल्यास भारतातील पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मात्र मागील ३ वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घटले आहेत. असे असूनही पेट्रोल, डिझेलचे दर कमी न होता उलट दिवसागणिक वाढत आहेत. मुंबईत तर पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये ५३ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी अतिशय वेगाने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्यामागे सरकारकडून लावण्यात आलेल्या करांचा मोठा हात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलवरील अबकारी शुल्क सरकारने १० रुपयांवरुन थेट २२ रुपयांवर नेले आहे. यामुळेच इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे.

‘१ जुलै २०१४ रोजी कच्च्या तेलाचे दर ११२ डॉलर प्रति बॅरल इतके होते. त्यावेळी देशातील पेट्रोलचा दर ७३ रुपये ६० पैसे प्रति लीटर इतका होता. १ ऑगस्ट २०१४ रोजी कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आणि ते १०६ डॉलर प्रति बॅरलवर आले. त्यावेळी देशात डिझेलचे दर ५८.४० रुपये प्रति लीटर इतके होते. सध्याचा विचार केल्यास, आज (१३ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर ५४ डॉलर आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या दरांची तुलना केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घटले आहेत,’ असे ‘एसएमसी ग्लोबल’चे रिसर्च हेड डॉ. रवी सिंह यांनी सांगितले.

जुलैपासून पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या दराने मागील तीन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये दररोज बदल होत असून बहुतेकदा त्यामध्ये वाढच होत आहे. यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. १६ जून रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर ६५.४८ रुपये प्रति लीटर इतके होते. यानंतर २ जुलै रोजी यामध्ये घट झाली आणि ते ६३.०६ रुपये प्रति लीटर इतके झाले. मात्र यानंतर पेट्रोलच्या दरात सतत वाढ होते आहे. याचा मोठा फटका देशातील लोकांना दररोज बसतो आहे.