बांगलादेशमध्ये आगीत होरपळून ५६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजधानी ढाकामध्ये ही आग लागली. रसायनाच्या गोदामाला लागलेली आग रहिवाशी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पाच इमारतींमध्ये ही आग पसरली होती. आगीत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीत अनेक जण जखमी झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

आग लागलेल्या इमारतींमधून बाहेर पडण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध नसल्याने अनेक लोक अडकून पडले होते. जिथे आग लागली तिथे रहिवाशी इमारतींसोबत, दुकानं आणि हॉटेल्स आहेत. केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकच्या दुकानही आगीत जळाली. या दुकानांमुळे आग प्रचंड वाढली होती ज्यामुळे लोकांना बाहेर पडता आलं नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख अली अहमद यांनी मृतांचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती दिली आहे. ५६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोध सुरु आहे. अली अहमद यांनी सांगितल्यानुसार, ‘गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली असावी’.