नवी दिल्ली : महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय लष्करातील मेजर जनरल आर. एस. जयस्वाल यांना शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले. याबाबत जनरल कोर्ट मार्शलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या शिक्षेवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शिक्कामोर्तब केले.

मेजर जनरल आर. एस. जयस्वाल हे तीन वर्षांपूर्वी नागालॅण्डमध्ये आसाम रायफल्समध्ये महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिला अधिकाऱ्याने केला होता.

या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणी भादंवि कलम ३५४अ आणि लष्करी कायद्यातील कलम ४५ नुसार दोषी ठरवत जनरल कोर्ट मार्शलने जयस्वाल यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. त्यास लष्करप्रमुख रावत यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. कोर्ट मार्शल सुनावणीदरम्यान जयस्वाल यांनी लैंगिक छळाचा आरोप फेटाळला होता. आपण लष्करातील अंतर्गत वादाचा बळी ठरल्याचा दावाही त्यांनी केला होता. सध्या जयस्वाल हे अंबालामध्ये सेवारत आहेत. बडतर्फीच्या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.